ठाणे : कळव्यामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शनिवारी एका महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. वनिता बावसकर (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृत्य उच्च रक्तदाबामळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. ठाण्यातील वागळे येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात वनिता बावसकर राहत होत्या. वनिता यांना गुरुवारी रात्री प्रसूतीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वनिता यांना पूर्वीपासूनच उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी रात्री त्यांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. त्यावेळी आई आणि बाळ सुखरूप असल्याचे वनिता यांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी सांगितले. परंतु, शनिवारी सकाळच्या सुमारास वनिता यांचा मृत्यू झाला. प्रसूतीमध्ये कोणताही गैरप्रकार घडला नसून, वनिता यांना पूर्वीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तिचे बाळ सुखरूप असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजीव कोर्डे यांनी दिली.
कळवा येथे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू