परभणी शहरातील खानापूर परिसरात घरगुती कारणावरून दुपारच्या दरम्यान पतीने पोलीस असलेल्या पत्नीचा दिवसा ढवळ्या धारदार शस्त्राने वार करून खून केला. व स्वत:वरही वार करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू केला आहे.
शहरातील खानापूर परिसरामध्ये कृष्णा माने व त्यांची पत्नी कमल जाधव-माने हे राहत होत्या. अनेक दिवसांपासून या दोघांत सतत भांडणे होत होती. माने हे पत्नीच्या चारित्र्यावर संशयघेत होते त्यामुळे त्यांच्यात अनेक वेळा झगडे होत असत. या पूर्वी ही माने यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने छळ करत असल्या बाबतची तक्रार दिली होती.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले की, शनिवारी ता.१४ दुपारी ३ वाजण्याच्या सुमारासदुपारी पती - पत्नी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर त्यांच्यात शुल्लक कारणाने वाद झाला. वाद होत असल्याचे पाहत कृष्णा माने याचा भाऊ आणि भावजय लहान मुलाला घेवून शेजारी काकाकडे गेले. त्यानंतर वाद विकोपाला गेल्याने कृष्णा माने याने पत्नीवर वस्ताऱ्याचे वार केले. कमल जाधव हिचा मृतदेह बेडरूममध्ये पडलेला होता. कृष्णाने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली.
दोघेही जागीच मरण पावले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, नवामोंढा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर तट यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. घरातील एका खोलीत कमल जाधव रक्तबंबाळ अवस्थेत तर खोलीच्या बाहेरील व्हरांड्यात कृष्णा माने हे मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. मयत कृष्णा माने याच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ, भावजयी व दीड वर्षाचा मुलगा आहे. कृष्णा माने व कमल जाधव यांचे दोन वर्षापूर्वीच लग्न झाले होते.
कृष्णा हा व्यवसायाने शेतकरी असून त्याला व्यसन होते असे उपस्थितांनी सांगितले. मयत कमल जाधव ही चारठाणा येथे कार्यरत असताना तिने कृष्णा विरोधात छळ केल्याची तक्रार दिली होती. कमलचे मुळगाव वसमत तालुक्यातील ईरेगाव आहे. तर कृष्णाचे मुळगाव पिंपरी देशमुख आहे. कृष्णाचे वडील भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले असून सध्या शेती करतात.