विडा गावची ही अनोखी परंपरा जावयाची काढली जाते गाढवावरून धिंड

भारतात अनेक भाषा , संस्कृती, प्रथा, परंपरा आजही कायम आहेत . वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे सण साजरे केले जातात. पण होळी हा सण संपूर्ण देशात साजरा केला जातो. पारंपरिक पद्धतीने , तर कुठे प्रथा परंपरा जपत हा सण साजरा केला जातो. पण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावातली परंपरा मात्र काही निराळी अनोखी आहे . इथे चक्क जावयाला गाढवावर बसवून त्याची गावभर धिंड काढली जाते. ही परंपरा या वर्षीही पाहायला मिळाली.



धुलिवंदनानिमित्त बीड जिल्ह्यातील केज तालुका विडा गावात एक अनोखी परंपरा मागील नव्वद वर्षांपासून जोपासली जात आहे. या गावातील जावयास आजच्या दिवशी गर्दभस्वारीचा मान मिळतो. म्हणजेच त्या दिवशी  जावयाची गाढवावर बसवून गावभर धिंड काढली जाते. ही परंपरा विडेकर गावकऱ्यांनी आजही सुरू ठेवली आहे.
होळीच्या चार दिवस आधीपासूनच विडा गावात जावयाचा शोध सुरू होता. त्यासाठी चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. यावर्षीचा  मान विडा गावचे ग्रामस्थ बाबासाहेब पवार याचें ग्रामस्थजावई दत्तात्रय गायकवाड यांना मिळाला. होळीच्या रात्री त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. धुळवडीच्या दिवशी सकाळी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर गाढव आणून त्यावर गायकवाड यांना मानासन्मानाणी बसवण्यात आले आणि त्यांची गावभर वरात काढण्यात आली.
विडा गावच्या हनुमान मंदिरा समोर ११ वाजता मिरवणुक संपली. नंतर जावयाला आंघोळ घालून नवीन कपड्यांचा आहेर गांवचे सरपंच काळे यांच्या हस्ते देण्यात आला. हा आगळा वेगळा धुलिवंदनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आजू बाजूच्या गावचे ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.