स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केल्या नंतर आणि वृत्तपत्रांनी बातम्या प्रकाशित केल्यानंतर मीरा-भाईंदर महानगर पालिकेमार्फत तयार केले जाणारे कोरोना संशयित रुग्णासाठीचे अलगीकरण कक्ष दुसऱ्या ठिकाणी बनवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी मिरा रोड डेल्टा गार्डन इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या म्हाडा इमारतीमध्ये कोरोना संशयित रुग्णासाठी सुरु करण्यात येणारा अलगीकरण कक्ष अखेर पालिकेकडून रद्द करण्यात आला आहे.
प्रभाग समिती सभापती आणि स्थानिक नगरसेवक यांच्यासह सथनिक नागरिकांच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सदर निर्णय घेतला.
मीरा- भाईंदर महानगर पालिकेमार्फ़त परिसरात कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डेल्टा गार्डन जवळील म्हाडाच्या इमारतीत तयार करण्यात येत असलेल्या अलगीकरन कक्षात केले जाणार होते. दरम्यान नागरिकांना चांगल्या सुविधा देणे हाच महानगर पालिकेचा मुख्य उद्देश आहे. तरी देखील स्थानिकांचा यास विरोध असेल तर दुसऱ्या ठिकाणी विलीगीकरण कक्ष सुरु करण्यात येईल असे आयुक्त चंद्रकांत डांगे यानी यावेळी सांगितले.याप्रसंगी सभापती विणा भोईर, नगरसेविका सुरेखा सोनार ,मोहन म्हात्रे यांनी स्थानिक नागरिकांसोबत महापौर, आयुक्तांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले होते.