कोरोना अलगीकरण केंद्र सुरु करण्यास स्थानिकांकडून केला विरोध
मीरा भाईंदर महानगर पालिके मार्फत कोरोनाचा संशयित रुग्ण व परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी डेल्टा गार्डन इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या म्हाडा इमारतीमध्ये कोरोना संशयित रुग्णासाठी अलगीकरण कक्ष पालिकेकडून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच त्याचे काम सुरु असतानाच स्थानिक नागरिकांनी काम बंद पडून तीव्र विरोध दर्शविला आहे.
याप्रकरणी सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास डेल्टा गार्डन परिसरातील येथे राहणारे नागरिक व स्थानिक नगरसेवक मोहन म्हात्रे, सुरेख सोनार व विना भोईर यांनी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांची भेट घेतली. त्यानां परिस्थिती लक्षात अनुन दिली. मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांना पत्र देऊन आपला विरोध दर्शविला आहे. या नंतर स्थानिक नागरिकांनी काम सुरु असलेल्या ठिकाणी जाऊन काम बंद पाडले.
डेल्टा गार्डन जवळ ज्या म्हाडा इमारतीमध्ये
संशयित रुग्णासाठी कक्ष बनवण्याचे काम सुरु आहे त्या इमारतीच्या आजुबाजुला दाटलोकवस्ती आहे. इमारतीं बरोबरच , पांडुरंगवाडी, महाजनवाडी, रायकरवाडी, पेणकरपाडा, मीरा गावठाण,मीरा गावं, मुन्शी कंपाउंड, सारखा चाळीचा परिसर आहे. या परिसरात अनेक शाळा, कॉलेज, धार्मिकस्थळे, सार्वजनिक स्थळे, बगीचे आहेत. त्यामुळे हि जागा कोरोनाअलगीकरण कक्षासाठी योग्य नाही. असे मत स्थानिक नागरिकांचे आहे.
जवळच मुंबई अहमदाबाद महामार्ग व ठाण्याकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या असल्याने या परिसरात कोरोना संशयितांसाठी कक्ष सुरु करणे म्हणजे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे. सदर निर्णय मोठ्या उद्रेका साठी कारणीभूत ठरेल पालिकेने घेतलेल्या निर्णयाचा स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने कोरोना विरोधाच्या लढाईत जी भूमिका घेतली आहे त्याला रहिवासियांचा पाठिंबा आहे फक्त कोरोना कक्ष सुरु करण्याबाबत ज्या जागेची निवड केली आहे तो निर्णय चुकीच्या माहितीवर आधारित आहे. आयुक्तांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा व दुसऱ्या ठिकाणी जेथे लोकवस्ती तुरळक आहे किंवा निर्मनुष्य जागेची निवड करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.