जिल्हाधिकारी यांनी दिलेला जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, आई वडील नातेवाईक, फोटोग्राफरसह आठ जणांना आज काही काळ पोलीस कोठडीची मिळाली हवा . गाजावाजा करून धूमधडाक्यात लग्न करण्याचा हट्ट नडला असून कायदा मोडला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
कोरोना व्हायरससंदर्भात राज्य सरकार आणि प्रशासन आपल्या स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याला काही लोकं चांगला प्रतिसाद देत आहेत तर काहीजण या स्थितीत देखील नियम मोडत आहेत.
बीडमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिलेला यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी, आई वडील नातेवाईक, फोटोग्राफरसह आठ जणांना आज काही काळ पोलीस कोठडीची हवा खावी लागली. ही घटना बीड जिल्हयातील माजलगाव शहरात जवळील ब्रम्हगाव येथे घडली. गाजावाजा करून धूमधडाक्यात लग्न करण्याचा हट्ट या मंडळींना नडला असून कायदा मोडला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव शहरापासून एक किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता यावेळी पोलिसांना लग्नस्थळी १०० ते १२५ लोकं जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उद्घोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितले. यावेळी पोलिसांच्या सूचना डावलत त्यांच्या आदेशाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले. यानंतर ५ ते ६ नातेवाईकांनी लग्न उरकून घेतले.