गटारांवर निकृष्ठ दर्जाची झाकणे ठेकेदारावर कारवाईची मागणी

गटारांचे  निकृष्ठ दर्जाची झाकणे


 


मिरारोड - मिरा भाईंदर शहरात  अनेक भागात जुन्या गटारावरील झाकणे तुटल्यामुळे परिसरात दुर्गंधीयुक्त वास पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.  
      रामदेव पार्क,केनवुड पार्क ,गोल्डन नेस्ट ,इंद्रलोक तसेच  काशीमीरा येथील राष्ट्रीय महामार्गावरील अमर पॅलेस ते काशीमीरा नाका या रस्त्यावरील गटारांची अनेक झाकणे तुटली आहेत. तर त्या गटारावर टाकलेला स्लॅब ही निकृष्ठ दर्जाचा असल्यामुळे तोही अनेक ठिकाणी तुटल्याचे दिसून येते. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता लहान झाला आहे. त्यामुळे तेथे नेहमीच वाहतूक कोंडी असते. गटारावर 
रिक्षा पार्किंग केल्या जातात. त्यामुळे त्या गटारावरील झाकणे तुटत आहेत. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात गटारे बांधण्याचे काम केले जाते. ही गटारे साफ करण्यासाठी गटारावर झाकणे बसवण्यात येतात. परंतु ही झाकणे निकृष्ठ दर्जाची टाकली जात असल्यामुळे ती झाकणे लवकर तुटतात. ती झाकणे तुटल्यामुळे तेथून जाणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. तुटलेल्या झाकणामुळे पादचारी त्यात पडून जखमी होऊ शकतात. तसेच त्यामध्ये वाहन जाऊन अपघातही होऊ शकतो.उघड़या गटारा मुळे बाहेर येणारा दुर्गंधीयुक्त वास अतिशय खराब व आरोग्यास हानिकारक असतो . यामुळे लोकांना मोठ्या आजाराना सामोरे जावे लागते.यापूर्वी देखील उघड्या झाकणाच्या दुर्घटना घडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील उघड्या गटारावर पावसाळ्यापूर्वी झाकणांना लवकर बदलण्यात यावे व निकृष्ठ दर्जाची झाकणे टाकणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे.