कोरोनाला घाबरून गावाकडे निघालेल्या परिवारावर काळाचा घाला

कोरोनाला घाबरून गावाकडे निघालेल्या परिवारावर काळाचा घाला


 


 दोन लेकींसह आईच मृत्यू झाल्याने संपूर्ण माकणी गावांवर पसरली शोककळा




जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे.जीवन हे नश्वर आहे  असे म्हटले जाते त्याला एक दिवस नाश व्हायचे आहे. पण मृत्यू च्या भीतीने माणसांची तारांबळ उडते.   कोरोनाची भीती ने स्वतःला वाचवण्यासाठी पवार आणि साठे कुटुंब गावी जात असताना अपघात झाला . चार जण ठार तर  पाच जण जखमी झाले आहेत.


  


काळाला कितीही हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला तरीही कोणता क्षण कोणासाठी काळ होऊन येईल हे सांगता येत नाही.


उस्मानाबाद जिल्ह्यातील  लोहारा तालुक्यातील माकणी येथील नारायण साठे व सतिश पवार हे कामानिमित्त पुणे थेथे वास्तव्यास आहेत. पुण्यात कोरोनाचा फैलाव  वाढत जाऊ लागल्याने ते आपल्या कुटुंबाचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी गावाकडे निघाले होते.  गावाच्या जवळपास पोहचले असतानाच  त्यांच्यावर काळाने घाला घातला. आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले . 


गावापासून अवघ्या तीन ते चार किमीटर अंतरावर असलेल्या खेड पाटीजवळ शुक्रवारी तारिख. २० मार्च ला  दुपारी पावणे तीनच्या सुमारास त्यांचा भीषण अपघात झाला.


माकणीहून येणाऱ्या एका कंटेनरची (एम.एच.१३ आर १२८७) व त्यांच्या कारची (एम.एच. १२ पीएच ६३२६) समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर एवढी भीषण होती की यात जागीच चार जण ठार झाले. यामध्ये चालक नेताजी मनोहर मोरे (वय २८) यांच्यासह मनिषा नारायण साठे (वय ३२), वैष्णवी नारायण साठे (वय १२), वैभवी नारायण साठे (वय आठ सर्व रा.
माकणी).


तर नारायण हरीदास साठे (वय ३६) त्यांचा मुलगा हरीश नारायण साठे (वय दोन), शीतल सतिश पवार (वय ३०), संस्कृती सतिश पवार (वय सहा), वेदांत सतिश पवार (वय तीन) असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. यातील हरीष साठे, शीतल पवार यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला, तर शीतल पवार (वय ३०), संस्कृती पवार (वय सहा), वेदांत पवार (वय तीन) यांना उस्मानाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता, की कारचा चक्काचूर झाला, तर कंटेनरचे समोरील चाक निखळून पडले. कार व कंटेनर यांच्यात झालेल्या या भीषण अपघातात कारचालकासह चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. मृतांमध्ये आई व दोन मुलींचा समावेश आहे. यात पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.


कोरोना संसर्गजन्य आजाराचे पुण्यात वाढते संक्रमण पाहता यातून आपली सुटका व्हावी, यासाठी गावाकडे निघालेल्या कुटुंबाला नियतीची नजर लागली. आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अखेर काळाने  घातलेल्या घाला हा हळहळ व्यक्त करायला लावणारा ठरला दोन लेकींसह आईच मृत्यू झाल्याने संपूर्ण माकणी गावांवर शोककळा पसरली आहे. दोन चिमुकल्यासह आईचा मृत्यू झाल्याने  परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.