कोरोनाच्या विषाणू वर औषध निर्माण करण्यासाठी जगातील शास्त्रज्ञांन मेहनत घेत आहेत. कोणत्याही विषाणूच्या वर औषध तयार करावयाचे असेल तर पहिले विषाणू वेगळा करून त्याचे संशोधन करावे लागते . आता भारतीय शास्त्रज्ञांनाही करोना विषाणू वेगळा करण्यात यश मिळालं आहे. याच्याच आधारावर लस आणि चाचणी केली जाऊ शकते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे
करोना विषाणू शरीरातून विलग करणारा भारत जगातला पाचवा देश ठरला आहे. यापूर्वी चीन, जपान, थायलंड आणि अमेरिकेने हे यश मिळवलं होतं. जगभरात आतापर्यंत ५ हजारपेक्षा जास्त जणांचा करोनामुळे जीव गेला आहे, तर जवळपास दीड लाख लोक यामुळे बाधित आहेत. भारतात ८३ जणांना करोनाची लागण झाली आहे, तर दोन जणांचा मृत्यूही झाला आहे.
करोना व्हायरसवर मात करण्यासाठी औषध नसणं ही सर्वात चिंतेची बाब होती. पण भारतीय संशोधकांच्या या प्रयत्नामुळे करोना विषाणूवर मात करणं शक्य होणार आहे. आयसीएमआरचे डॉक्टर, बलराम भार्गव यांच्या मते, हे मोठं यश आहे. कारण, यामुळे औषध, लस आणि चाचणी करण्यासाठी मोठी मदत होईल. करोना व्हायरसला वेगळं करणं अत्यंत कठीण होतं, कारण भारतात करोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी आहे.
गळा आणि नाकापासून घेतलेल्या एकूण २१ सॅम्पलची चाचणी करण्यात आली. यानंतर हे यश मिळाल्याचं डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितलं. यामध्ये ११ चाचण्या सकारात्मक आल्या, ज्यात व्हायरसचे ८ घटक वेगळे करण्यास मदत झाली. वुहानमधून पसरण्यास सुरु झालेल्या व्हायरसशी हा व्हायरस ९९.९८ टक्के मिळताजुळता असल्याचं डॉ. गंगाखेडकर म्हणाले.
एड्सच्या उपचारात एचआयव्हीविरोधात वापरल्या जाणाऱ्या lopinavir आणि ritonavir चा वापरही करोनाबाधित काही रुग्णांवर करण्यात आला. यामध्ये इटलीच्या रुग्णांचा समावेश आहे, जे जयपूरच्या सवाई मान सिंह रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, यामुळे किती फायदा होईल हे आत्ताच सांगितलं जाऊ शकत नाही, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, इबोलावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Remdesivir चा वापरही करोनावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
रमण गंगाखेडकर यांचा त्यांच्या प्रेरणादायी कामासाठी पद्मश्री पुरस्कारानेही गौरव करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट संशोधन संस्थेत काम केलं आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंतर्गत सध्या मानव जातीला आव्हान असलेल्या १४ संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांबद्दल काम करणाऱ्या संस्था या मराठी माणसाच्या हातात आहेत.