आईच्या चौदाव्या दिवसाचे गंगापूजन टाळून केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत

आईच्या चौदाव्या दिवसाचे गंगापूजन टाळून केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत


ज्या ज्या वेळी देशावर संकटाची वेळ येते तेंव्हा तेंव्हा संकटाचा सामना करण्यासाठी बळ मिळते ते अनेकांच्या प्रेरणेतून भूकंप,अतिवृष्टी,चक्रीवादळ या सारखी नैसर्गिक आपत्ती, असो किंवा रोगराईची साथ असो   देशातील कोणतीही आपत्ती असो अशा आपत्ती काळात दानवृत्ती देणारांचे हात सतत पुढे येत आहेत. नुकतेच सामाजिक न्याय मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या प्रशांत जोशी यांच्या आईचे म्हणजे सौ. इंदुबाई भास्करराव जोशी यांचे  निधन झाले. आज त्यांच्या मातोश्रीच्या चौदाव्या दिवसाचा गंगापुजनाचा (गोडजेवण) कार्यक्रम.


आईची आठवण आणि मनात दाटून आलेली  दु:खाची कड बाजूला ठेऊन त्यांनी सामाजिक जाणीवेतून  परंपरेला फाटा दिला. आईच्या चौदाव्याचा गोडजेवणाचा कार्यक्रम न करता त्या कार्यक्रमाला येणारा खर्च टाळून तो पैसा दान देण्यात वापरला आहे. कोरोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आईची आठवण म्हणून २५ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला.आज संपूर्ण जग कोरोना विषाणुशी लढत आहे. आपला देश आणि आपले राज्य ही पुर्ण क्षमतेने या युद्धात उतरलं आहे. आपल्या सगळ्यांना मिळून कोरोनाला हरवायचचं आहे. गर्दी टाळून- शिस्त पाळून. मग आईचा चौदाव्याचा कार्यक्रम कसा करणार? त्यापेक्षा तिच्या नावे फुल  ना फुलाची पाकळी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याचा निर्णय जोशी कुटुंबियांनी घेतला आणि तो अंमलात देखील आणला.या “गोड जेवणाला” आई जाण्याच्या दु:खाची किनार असली तरी सामाजिक जाणीवेचे कोंदण आहे. असे अनेक मदतीचे हात या दानशूर महाराष्ट्रातून पुढे येत आहेत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करून मदत करत आहेत.  राज्यातली लहानगी चिमुरडी मंडळी वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करत आहेत तर कुणी वस्तु स्वरुपात मदत करत आहे. याच दातृत्व भावाने केलेल्या मदतीमुळे आणि सहकार्यांच्या हातांमुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आत्मबळ लाभत आहे.  या सर्वांच्या दातृत्वभावाला खरच मनापासून जेवढे आभार व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.