- पावसामुळे डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याचा ढीग कोसळून ८ घरांचे नुकसान जीवित हानी या कारणामुळे टळली
भाईंदर- मिरा भाईंदर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार अखेर उत्तन मधल्या आठ घरांना नाडलाच त्यात घराचे सामानाचे नुकसान झाले मात्र जिवीतहानी टळली. मुंबईत व आजूबाजूच्या परिसरात पावसाला नेमकीच सुरवात झाली आहे. उत्तन येथे डम्पिंग ग्राऊंड असून ४ जुलै २०२० रोजी रात्री १० वाजता या डम्पिंग ग्राऊंडचा कचरा खाली कोसळून ८ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिरा-भाईंदर मनपा जेवढे लक्ष रोगराई शहरातील आरोग्यविषयक ज्या समस्या उद्भवतात त्याकडे दुर्लक्ष करत आलेली आहे. भाईंदर पश्चिम मध्ये उत्तन येथे असलेला डोंगराळ भाग आणि त्या भागात उत्तन धावगी येथे डम्पिंग ग्राउंड उभारण्यात आले आहे. सतत या विभागातील नागरिकांकडून याला विरोध करण्यात आला आहे. स्थानिक परिसरातिल नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधी चा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांचा विरोध असताना ही मिरा भाईंदर शहरातील संपूर्ण कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो. पर्यायी व्यवस्था करावी या साठी मनपा प्रशासन हवे तेवढे तत्पर दिसत नाही तर शहराचा कचरा काही दिवसांपासून डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकलेल्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याचे काम ठप्प आहे त्यामुळे तेथे मोठे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. पालिका आरोग्य विभागाकडून या डम्पिंग ग्राऊंडकडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच ४ जुलै रोजी हा कचरा कोसळून खाली असलेल्या ८ घरावर कोसळला. कचरा घरावर पडल्यामुळे ती घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे घरातील सर्व सामानाचे नुकसान झाले आहे. त्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना रात्रीच आजूबाजूच्या घरात तात्पुरते राहण्याची व्यवस्था करण्यात आली. या नुकसान झालेल्या घरामध्ये पिठाची गिरणी वाहून गेली तर बाकी सर्व लोकांचे सामान जमिनीत दबले गेले. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. डम्पिंग ग्राऊंड हे उंचावर असल्यामुळे तेथे असलेला कचरा कोसळताना मोठा आवाज निर्माण झाला. त्या आवाजामुळे रहिवाशांना घराबाहेर निघण्यास वेळ मिळाला आणि आपले प्राण वाचवण्यास संधी मिळाली म्हणून आम्ही बचावलो असे तेथील एका रहिवाशाने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मदतीस अग्निशमन दल, सागरी पोलीस प्रशासन, प्रभाग अधिकारी, अदाणी कंपनीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन यांनी वेळेवर पोहोचून रहिवाशांना मदत केली. महानगर पालिका प्रशासन कागदी घोडे नाचवून आपली जबाबदारी मुक्त करू पाहते पण त्या डम्पिंग ग्राऊंड च्या लगत असलेल्या झोपड्यांना पर्यायी व्यवस्था केली जात नाही हे दुर्दैव आहे. मोठी दुर्घटना घडली तरच या मनपा सत्ताधाऱ्यांना आणि शासनाला जाग येईल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
डम्पिंग ग्राऊंडच्या खाली राहत असलेल्या रहिवाशांना पालिकेने घरे खाली करण्यासाठी नोटीस दिल्या आहेत, त्यांची पर्यायी ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच रहिवाशांचे झालेले नुकसान भरपाई मिळावी असे तेथिल नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी सांगितले.