रुग्ण जिवंत असतांनाही मृत्यू झाल्याचा आला फोन पुन्हां एकदा उघडा झाला भोंगळ कारभार

रुग्ण जिवंत असतांनाही मृत्यू झाल्याचा आला फोन पुन्हां एकदा उघडा झाला भोंगळ कारभार



मीरारोड - कोविड १९ रुग्णालयाचा आंधळा कारभार सुरू आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. कारण कोरोनाची लागण झालेल्या एका महिलेला दाखल करण्यात आले त्या महिलेच्या घरच्यांना चक्क रुग्ण मरण पावल्याचा फोन भाईंदरच्या कोविड रुग्णालयातून केला गेला होता. त्यानंतर महिलेच्या नातलगांची रडारड सुरू झाली. पण नंतर मात्र चुकून फोन केला गेल्याचे सांगण्यात आले. या घडलेल्या प्रकारामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.


 


मिरारोड कोरोनाचे संक्रमण झालेल्या एका महिलेस 30 जुन रोजी भाईंदर च्या कोविड रुग्णालयात दाखल केले होते. परंतु व्हेंटिलेटर व आयसीयू बेड रिकामा नसल्याने त्यांचे नातलग अन्य रुग्णालयात सदरची सुविधा मिळते का पहात होते. पण एक कर्मचाऱ्याकडून शहरातील एका खाजगी रुग्णालयाचे नाव सुचवण्यात आले पण त्यांनी सांगितलेली रक्कम आणि दररोजचा खर्च जास्त असल्याचे सांगण्यात आले ते परवडणारे नसल्याने सदर रुग्णाच्या नातलगांना मुंबईच्या नायर रुग्णालयात खाट उपलब्ध झाली.


 


रुग्णाला नायर रुग्णालयात पोहचावण्यासाठी पालिकेने रुग्णवाहिका नसल्याचे सांगीतल्याने मुंबई भागातील एका खाजगी कार्डिएक रुग्ण वाहिकेस भाईंदरला येऊन नायरला नेण्याकरीता भाडेही ठरले आणि तारीख 3 रोजी सकाळी रुग्णवाहिका मुंबई वरुन येत असतानाच दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना भाईंदरच्या कोविड-१९ जोशी रुग्णालयातून बोलत असल्याचा फोन आला आणि तुमचा रुग्ण मृत पावल्याचे सांगितले गेले. ते एकुन नातलगांची धावपळ उडाली व नातलग रुग्णालया जवळ जमा झाले. त्यांची रडारड सुरु होती.


मुंबईवरुन येणाऱ्या रुग्णवाहिका चालकास येऊ नको असा निरोप दिला. पण नातलगांनी रुग्णालयात चौकशी केली तेव्हा मात्र रुग्ण जिवंत असल्याचे सांगण्यात आले. या घडलेल्या प्रकाराने नातलगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मग पुन्हा रुग्णवाहिका चालकास येण्यास फोन केला पण तो पर्यंत नायर रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा बेड निघून गेल्याने मग सेव्हन हिल्स रुग्णालयात रुग्ण महिलेस नेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सरिता नाईक यांनी घडल्या प्रकाराची माहिती देत एकूणच पालिका कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या आधी देखील या कोविड-१९ जोशी रुग्णालयात एका मुलास त्याच्या कोरोनाग्रस्त वडिलांचा मृतदेह ऐवजी दुसराच मृतदेह दिला होता. डोक्यावरील केसा वरुन वेळीच मुलाला कळले म्हणून गंभीर चूक टळली होती. असे गंभीर प्रकार वारंवार घडत असल्याने शहरातील नागरिकांनी नाराजगी व्यक्त केला आहे.