भाईंदर मध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

भाईंदर मध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांवर गुन्हा दाखल 



भाईंदर -  कोविड-१९ ची साथ देशात राज्यात आणि शहरात वेगाने पसरत आहे. मिरा-भाईंदर शहरात या साथीची साखळी तोडण्यासाठी १० जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन सुरू केला आहे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी तसे आदेश दिले आहे. शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल खुले ठेवण्यास देखील परवानगी नाकारली आहे. स्टॉल खुले ठेवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी पोलिसांना दिल्याचे समजत आहे. यानुसार भाईंदर पोलिसांनी रविवारी प्रशांत केळवणकर या वृत्तपत्र स्टॉलधारकावर गुन्हा दाखल केला आहे . 


 


 


       कोविड-१९ च्या महामारीची साथ जशी देशात पाय पसरायला सुरवात करायला लागली तसे लॉकडाउन सुरू करण्यात आले. मार्च महिन्यापासून सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीत वृत्तपत्र स्टॉल वर कोणीही आतापर्यंत आक्षेप घेतला नसला तरी सध्याच्या लॉकडाऊनमध्ये मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयूक्त पदावर नव्याने नियुक्त झालेले आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी वृत्तपत्र स्टॉलवर आक्षेप घेत वृत्तपत्र स्टॉल सुरु ठेवण्यासही मनाई केली आहे, स्टॉल सुरु दिसल्यास त्यावर कारवाईचे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अशा प्रकारचा वृत्तपत्र विक्रेत्यावर गुन्हा नोंद झाल्याचे ऐकिवात नाही, शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यावर हा पहिलाच गुन्हा नोंद झाला आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या माहिती व तंत्र संचालनायाने वृत्तपत्र वितरणाला पायाभूत सुविधांयुक्त परवानगी असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने वृत्तपत्र विक्रीला देखील परवानगी दिली आहे.


      मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या मते स्टॉल सुरू ठेवल्यास तेथे वाचकांची गर्दी होते व सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे उल्लंघन होते. अशा गर्दी होणाऱ्या वृत्तपत्र स्टॉल्सवर लक्ष ठेवणाऱ्या आयुक्तांनी थेट स्टॉधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. भाईंदर पोलिसांनी रविवारी पालिका मुख्यालयाजवळ असलेल्या वृत्तपत्र विक्रेता प्रशांत यांना थेट पोलीस ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल केला. . वृत्तपत्रे स्टॉलमध्ये ठेवुनच ते घरपोच वितरणनिहाय वेगवेगळे करून वितरणासाठी नेले जातात. त्यातच सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये तुरळक वाचक वृत्तपत्र खरेदीसाठी येत असतात. शहरातील वृत्तपत्रधारकांनी आयुक्तांच्या या परस्पर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत वृत्तपत्रे विक्री व वितरण सुरू ठेवण्यास पालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांनी केली आहे तर या नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.