कोविड-१९ च्या रुग्णांना कोव्हीड सेंटर मध्ये मिळते निकृष्ट दर्जाचे जेवण 

कोविड-१९ च्या रुग्णांना कोव्हीड सेंटर मध्ये मिळते निकृष्ट दर्जाचे जेवण 


 



  • जेवणात खडे, केस, अळ्या निघाल्याचा प्रकार


 


मिरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा अजब कारभार सुरू आहे. रुग्णांची आणि नागरिकांची हवी तशी काळजी घ्यायला हवी आहे तसी मनपा कडून घेतली जात नाही. रुग्णांच्या जेवणाची परवड केली जात आहे. कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून जेवणात खडे ,केस व अळया निघत असल्याचा प्रकार रुग्णांनी उघडकीस आणला आहे. या पूर्वी ही स्थलांतरित कामगारांच्या जेवणात गावठण,काजूपाडा या परिसरात वाटप करण्यात आलेल्या जेवणात आळ्या,किडे मिळून आले होते. आता तर चक्क रुग्णांच्या जेवणात असे प्रकार होत असल्याचा रुग्णांच्या तक्रारी मुळे रुग्णानी पालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. 


 


     देश कोरोनाच्या सावटाखाली जात आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून कोरोना साथीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जात आहे. भाजपची सत्ता असलेली महानगर पालिका आहे. या महानगर पालिकेचा अनागोंदी कारभार सुरू आहे. कोरोनाचे संक्रमण झालेल्या रुग्णाना रामदेवपार्क येथील कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. एकीकडे पालिका रुग्णाच्या देखभाल व आरोग्याकडे जेवढे लक्ष देने आवश्यक आहे तेवढे दिले जात नाही. रूग्णांना मात्र निकृष्ट दर्जाचे जेवण व अनेक असुविधाचा सामना करावा लागत आहे. कोविड सेंटर मधील रुग्णाकडे कर्मचारी लक्ष देत नसून व्यवस्थित मार्गदर्शन करत नाहीत यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रविवारी रुग्णाना दिलेल्या जेवणात कच्या चपात्या,भातात केस,आळ्या निघाल्यामुळे तेथील रुग्ण हे संतापून इमारतीच्या खाली उतरून आपला संताप व्यक्त करू लागले. त्यापैकी काही रुग्णानी आपल्याला इकडे आल्या पासून पिण्यासाठी गरम पाणी मिळत नसून, रूम देखील स्वच्छ नाही, रूम मध्ये अगोदरच्या रुग्णाचे साहित्य तसेच पडलेले आहे,रूम सैनीटायझर देखील केला नसल्याचे सांगत,जेवण वेळेवर भेटत नसून ,लहान मुलाचे देखील पोट भरणार नाही इतके कमी जेवण दिले जाते तसेच जेवण खूप उशिरा दिले जाते, चपात्या कच्च्या असतात,जेवणात केस सापडतात,रोज तेच तेच जेवण असते अश्या प्रकारच्या अनेक समस्या त्यांनी सांगुण कोविड सेंटर मध्ये रुग्णांचे हाल होत असल्याचा रुग्णांनी आरोप केला आहे. 


          मिरा-भाईंदर महानगर पालिकेने रुग्णाना जेवण पुरवण्यासाठी ठेकेदाराला ठेका दिला आहे. ठेकेदार हा कोणत्या प्रकारचे , कसे जेवण देतो याकडे पालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे परंतु अधिकारी हे जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. पालिका प्रशासनाने रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे यामुळे रुग्णांचा बरे होण्याचा आकडा वाढेल असे काही रुग्णांनी मत व्यक्त केले. सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत. विरोधकांनी यावर चुपी साधली आहे. सत्ताधारी आणि विरोधक शांत बसल्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांची मनमानी कारभार सुरू आहे असे जाणकार मत व्यक्त करत आहेत.