मराठी भारतीने केले उर्जामंत्र्यांच्या विरोधात घंटानाद आंदोलन...

मराठी भारतीने केले उर्जामंत्र्यांच्या विरोधात घंटानाद आंदोलन...


 


मराठी भारती संघटनेच्या माध्यमातून आज अनेक ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. अनेक घरा-घरातून या आंदोलनाला सामान्य लोकांनी, हातावर पोट असणाऱ्या लोकांनी थाळ्या वाजवून ऊर्जामंत्री भानावर या, ऊर्जामंत्री जागे व्हा, आमचे वीजबिल माफ करा च्या घोषणा दिल्या असे संघटनेच्या अध्यक्षा ऍड.पूजा बडेकर यांनी म्हटले आहे.


 


अनेक दिवसांपासून मराठी भारती विजबिलसंदर्भात लढा देत आहे, संघटनेच्या प्रयत्नांमुळे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बैठक घेऊन MERC कडे प्रस्ताव पाठवला पण आज अनेक दिवस उलटून गेल्यावरही त्यांनी एकही प्रतिक्रिया दिली नाही याचा निषेध ऍड. पूजा बडेकर यांनी केला आहे. 


 


लीलाधर गायधने यांनी वीजबिल जास्त आल्यामुळे आत्महत्या केली. आणखी किती लोकांचे बळी जाण्याची आपण वाट पाहत आहात असा सवाल संघटनेच्या कार्याध्यक्षा विजेता भोनकर यांनी केला आहे. 


 


जोपर्यंत या संदर्भात ऊर्जामंत्री निर्णय देत नाहीत, 300 युनिटपर्यंत वीजबिल माफ होत नाही व 1 एप्रिल रोजी केलेली विजदरवाढ रद्द होत नाही तोपर्यंत मराठी भारती शांत बसणार नाही, आंदोलने आणखी तीव्र होत जातील असा इशारा संघटनेचे संघटक राकेश सुतार यांनी दिले असल्याचे आशिष गायकवाड यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.