अधिकारी, ठेकेदार व नगरसेवकांनी नालेसफाई बाबत केलेले खोकले दावे एकाच पावसाने आणले चव्हाट्यावर

अधिकारी, ठेकेदार व नगरसेवकांनी नालेसफाई बाबत केलेले खोकले दावे एकाच पावसाने आणले चव्हाट्यावर



पावसाळा सुरू होऊन ही दोन महिने उलटले आहेत पण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने हजेरी लावली नव्हती पण काल रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मात्र अनेक सखल भाग जलमय केले. मिरा भाईंदर मधिल काशीमीरा, मिरारोड, भाईंदर पूर्व , भाईंदर पश्चिम भागातील रहिवाशांच्या घरात पाणी साचल्यामुळे नागरिकांचे हाल व सामानाचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी व ठेकेदार नगरसेवक यांनी केलेले नालेसफाईचे खोकले दावे चव्हाट्यावर आले आहेत.


 


मुंबईसह उपनगरे आणि आजूबाजूच्या परिसरात दमदार पाऊस पडला त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. मीरा भाईंदरमध्ये मध्यरात्री काही तास जोरदार पाऊस पडला असल्यामुळे सगळीकडे शहरांमध्ये पाणी जमा झालेले दिसून आले. यामध्ये मुख्यत्वे काशीमिरा परिसरातील कृष्णस्थळ , मिरागाव, मुन्शीकंपाउंड,काशिगाव, लक्ष्मी बाग, मिनाक्षी नगर, ग्रीनव्हिलेज, डाचकूलपाडा, घोडबंदर या भागात तीन ते चार फूट पाणी जमा झाले होते. मिरारोड परिसरात शांती पार्क, नगरशीतल , नयानगर, हाटकेश ,भाईंदर पूर्व , भाईंदर पश्चिम अशा सर्वच भागात भागात कमरेपर्यंत पाणी जमा झालेले पाहायला मिळाले. तळमजल्यावरील अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यरात्री जोरदार वादळासह जोराचा पाऊस सूरु झाल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी झाडे ही पडलेली दिसून आली, चार चाकी , दोनचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या त्यामुळे शहरातील जनतेचे मोठे नुकसान झाले आहे .


मिरा रोड भागात १३ झाडे, उत्तन १२ झाडे ,


भाईंदर पश्चिम ५ झाडे , भाईंदर पूर्व १० झाडे पडली आहेत. लॉकडाउनमुळे कंबरडे मोडलेल्या काळात सर्वसामान्य माणूस उदरनिर्वाहासाठी धावत असतांनाच दोन महिने उसंत घेतलेला पाऊस धोधो कोसळायला लागला असल्याने शहराची दाणादाण उडवनारा ठरला आहे परिपुर्ण नालेसफाई न झाल्यामुळे तात्काळ नाले तुंबलेले दिसून आले त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात हे पाणी शिरल्याचे स्थानिक रहिवाशी बोलत आहेत. शहरात लहान मोठे नाले मिळून १५५ नाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लहान मोठे नालेसफाईच्या नावावर करोडो रुपयांचा ठेका दिला जातो. तरीही दरवर्षी शहराला जलमय व्हावे लागते. दरवर्षी अर्धवट नालेसफाई बाबत आरोप केले जातात. या वर्षीही मोठया प्रमाणात झाले पण झोपेचे सोंग घेतलेले मिरा-भाईंदरमहानगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार, सत्ताधारी, आपण निवडून दिलेले नगरसेवक यांना वारंवार निदर्शनास आणून देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेलेली नालेसफाईने अखेर आपला इंगा या शहराला अखेर दाखवलाच अर्धवट झालेल्या नालेसफाईमुळे अनेकांची घरे पाण्याखाली गेली तर अनेक चार चाकी दुचाकी वाहने तुंबलेल्या पाण्यावर तरंगताना दिसली आहेत घरातील समानांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे या शहारातील जनता पोटतिडकीने प्रश्न विचारत आहे. जबाबदार अधिकारी, ठेकेदार व नगरसेवक यांच्या बेफिकिरीमुळे आमच्यावर ही वेळ आली आहे. त्या बेजबाबदार अधिकारी , ठेकेदार, स्थानिक नगरसेवक यांच्यावर कारवाई करण्यात येणार का ? अशा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.