वसा सावित्रीचा घेऊन चालवू प्रगतीचा वारसा...!

 वसा सावित्रीचा घेऊन चालवू प्रगतीचा वारसा...!

नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना या नववर्षाची सुरुवात 3 जानेवारी या सुवर्ण दिवशी अशा व्यक्तीच्या जयंतीने होत आहे की, त्या व्यक्तीमुळे आजच्या भारतीय स्त्री सर्वक्षेत्रात गगन भरारी घेत आहे. ती व्यक्ती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले होय. थोर समाजसेवक महात्मा ज्योतीबा फुले यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या मनुच्या `न स्त्रीं स्वातंत्र्यमर्हति' च्या  प्रथेलाच छेद देत आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीमाईंना अक्षर ओळख करुन देऊन स्त्री शिक्षणाचा पाया रचविला. त्यानंतर दोघा दांपत्यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. आणि सावित्रीमाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या. अवघ्या 15 -16 वर्षाच्या सावित्रीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रस्थापित समाजाविरुध्द बंड पुकारले होते. स्त्रीने शिक्षण घेतले किंवा अर्थाजनासाठी तिने घराचा उंबरठा ओलांडला तर समस्त कुळाचा विध्वंस होतो या खोट्या आणि खुळचट मनुनितीला त्या काळी सावित्रीमाईंनी सुरंग लावला होता. तिने केलेल्या बंडाने आज अनेक सावित्रीच्या लेकींना घडविले, आणि घडतच आहेत. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीमाई खचल्या नाहीत की, रडत बसल्या नाहीत, अगदी कंबर खचून त्या स्त्रीशिक्षणाचा प्रचार आणि प्रसार गाव-खेड्यापर्यंत करीत राहील्या त्या अगदी शेवटपर्यंत. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक सामाजिक बदल घडत गेले. त्यात स्त्रीशिक्षणाचा होणारा प्रसार देशाच्या प्रगतीसाठी मोलाचा वाटा ठरला. प्रत्येक स्तरातील स्त्री शिकावी, यासाठी अनेक सवलती मिळाल्या, अनेक कायदे निघाले, गेल्या काही वर्षात मुली आणि स्त्रियांसाठी शाळा, महाविद्यालये स्थापन झाली. स्त्री शिक्षणाने स्त्रीयांनी सर्व क्षेत्र पादाक्रत केली. आमदार, खासदार, मंत्रीपद, मुख्यमंत्री ते देशाच्या प्रधानमंत्री, राष्ट्रपतीच्या पदावर देखील स्त्री आरुढ झाली. कला असो वा क्रिडा राजकारण असो वा समाजकारण, प्रसारमाध्यमे असो वा प्रचारमाध्ये या साऱ्यात महिला आघाडीच दिसते. इतकेच काय आज दहावी, बारावीच्या निकालाच्या वेळी मुलींनीच बाजी मारलेली दिसते. `मुलगी शिकली, प्रगती झाली' असे चित्र आता समाजात दिसू लागले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 रोजी स्त्री आणि शुद्रांना हिनतेचा दर्जा देणारी मनुस्मृती जाळली. तरी देखील मनुवादी विचारसरणी समाजात आज जिवंत आहे. शिक्षणाची देवता कोण? याचे उत्तर `सरस्वती आणि गणपती' असे का बरं येते? प्रत्येक शाळा, महाविद्यालयात, ग्रंथालयात आपल्याला आजही या देवतांच्या प्रतिमा पहावयास मिळतात. तसेच अनेक शाळांना नावेही याच देव-देवतांच्या नावावरुन ठेवली जातात. मुळात या देवतांनी शिक्षणासाठी कोणत्या शाळा काढल्याची नेंद कुठे सापडते का? पण ज्या महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी स्त्री आणि तळागाळातील लोकांना शिक्षण मिळावे म्हणून अंगावर कर्मठ सामाजाचे दगड - गोटे, शिव्या - शाप झेलले अशा थोर व्यक्तींची साधी स्मृतीही लोकांना ठेवता येत नाही. त्यांच्या या त्यागमय कार्याला विसरणे म्हणजे त्यांचा घोर अपमान आणि आपला करंटेपणाच आहे. जुन्या बुरसटलेल्या विचारांना कुरवाळत बसत आजच्या स्त्रियांना सावित्री म्हणजे `सत्यवान आणि सावित्री' या काल्पनिक गोष्टीतील सावित्रीच माहित. याच खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून वर्षानुवर्षे कितीतरी स्त्रिया वटसावित्रीची पूजा-अर्चा करतात. पण वास्तवात ज्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचे वाण आपल्याला दिले आहे त्या सावित्रीमाई फुलेंचा मात्र विसर पडलेला दिसतो. पुणे विद्यापीठाला सावित्रीमाईचे नाव देण्यासाठी किती संघर्ष करावा लागला, हे यावरुन दिसतेच.

स्त्रीने शिक्षणाच्या सहाय्याने प्रगतीची उत्तुंग शिखरे गाठली. प्रत्येक क्षेत्रात तिने आपले विशिष्ट स्थानही मिळविले. पण मी संपुर्ण देशातील स्त्री शिकली असे म्हणू शकत नाही. कारण आजही खेड्या-पाड्यातील मुलींना शिक्षण मिळत नाही, काही ठिकाणी मूली 7 -9 वी इयत्ताच्या पुढे आपले शिक्षण थांबवितात. तर काहींना पालक शिकवितच नाहीत, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मग आई - वडिलांना घरात मदत करण्यासाठी, लहान भावंडाना सांभाळण्यासाठी, शेतावर मजुरीकरीता त्यांना आयुष्यभर राबावे लागते. कधी कधी तर समाजाच्या वासनागंध नजरांपासून वाचविण्यासाठी त्यांचे लहान वयातच लग्न लावून देतात. आता पुढारलेल्या शहरी भागात देखील असे प्रकार पहायला मिळतात, यावर अजूनही विश्वास बसत नाही. पाकिस्तानची मलाला युसुफई सर्वांनाच माहित आहे. तालिबानातील मुलींना शिक्षण मिळावे म्हणून तिने तालिबानी दहशतवाद्यांशी धीटपणाने लढा देला होता मुलींना शिक्षण देणे हे धर्मविरोधी कार्य आहे म्हणून मलालावर तिथल्या धर्मांध दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात ती बचावली पण मलालाने माघार घेतली नाही. तिच्या ह्या धाडसाचे कौतुक साऱ्या जगाने केले आणि त्यामुळेच तिला शांततेचे नोबेल पारितोषिक ही मिळाले. अशा ह्या सावित्रीच्या लेकीचे कौतुक तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे, पण आजही आपल्या समाजात स्त्राr शिक्षणाला विरोध होतोच. मग आपल्यात आणि त्या तालिबानी दहशतवाद्यांमध्ये काय फरक आहे? स्त्री शिक्षणामुळे कोणताही धर्म वा जात भ्रष्ट होत नाही, उलट स्त्री शिक्षणामुळे समाज सुधारतो, शिक्षित होतो आणि घराची, समाजाची प्रगती होते.

बहुतेक घरातील पालक मुलाच्या शिक्षणाचा जसा विचार करतात तितकाच मुलींच्या शिक्षणासाठी विचार करीत नाहीत. मुलींनी शिकावे, पगती करावी, स्वतचे करियर घडवावे, यापेक्षा तिने लग्न करावे, तिला चांगला नवरा मिळावा, तिने संसार सुखाचा करावा हीच अपेक्षा घरचे ती जन्माला आल्यापासून बाळगत असतात. घरची, मुलांची जबाबदारी आल्यावर लग्नानंतरही अनेक जणींना नोकरी सोडावी लागते. मुळात लग्न ठरताना देखील `लग्नानंतर मुलीने नोकरी करायची नाही' अशी अटच घातली जाते. माझ्या बहुतेक मैत्रिणी उच्चशिक्षित आणि पदवीधर आहेत, पण लग्न झाल्यावर संसारात गुंग झालेल्या दिसतात. प्रतिभा असूनही काही स्त्रीया आपले शिक्षण वाया घालवतात. नवरा, मुलं, सासर- माहेरच्या लोकांच्या मर्जी राखत स्वतच्याच `स्व' चा त्याग करतात, म्हणूनच स्त्रीला त्यागमुर्ती म्हटले जाते का? तसेच कोणत्याही क्षेत्रात करियर करणाऱ्या आजच्या सावित्रीला आपल्या आयुष्यातील जोतिबाची साथ मिळतेच असे नाही पण काही ठिकाणी अनेक पुरुष आपल्या आईला, बहिणीला, मुलीला, बायको वा मैत्रिणीला तिच्या प्रगतीत मोलाची साथ देऊन तिच्या जीवनातील खरा जोतीबा बनतात.घरोघरी सावित्री घडत असते पण त्याच बरोबर जोतिबाही घडवला पाहिजेच. तुम्हा आम्हा सर्वांना क्रांतीज्योती सावित्रीमाईंनी शिक्षणाचा वसा दिला आहे, आणि हा वसा प्रगतीच्या माध्यमातून आपण येणाऱ्या पिढ्यान्पिढ्या चालवायचा आहे. त्यासाठी या समाजातील, देशाची प्रत्येक महिला, मुलगी शिक्षीत होणे अत्यंत गरजेचे आहे.

स्त्री शिकत असताना ती केवळ एकटीच शिकत नसते तर साऱ्या समाजाला शिकवित असते. शिक्षणाने ती आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या स्वावलंबी बनते. आपल्या आजुबाजूला अनेक अशा स्त्रिया असतील ज्यांना सक्षमीकरणाची गरज आहे. यासाठी शासनाने सरकारने आणि आपण सुध्दा मदत करायला हवी. चार माणसांचा संसाराचा गाडा चालविणारी स्त्री आज 400 माणसांना घेऊन विमान देखील चालवू शकते हे सावित्रीच्या लेकींनी सिध्द करुन दाखविले आहे. आजच्या आधुनिक काळात सुध्दा सर्वच स्त्रियांनी मग ती 60 वर्षाची आपली आजी असो वा 6 वर्षांची आपली मुलगी या सर्वच वयोगटातील स्त्रीने संगणक, मोबाईल, लॅपटॉपसारख्या अत्याधुनिक यंत्राचे शिक्षण घेणे गरजेचे आहे. जसा काळ बदलला तसे आपणही बदलायला हवे. जसे ज्योतिबांनी एका सावित्रीला घडविले तसेच आता आपण सर्वानी मिळून अनेक खेडो-पाडयातील सावित्रींना घडवायचे आहे. `वक्त हे बदलने का' असे एका जाहिरातीचे वाक्य आहे. त्याचप्रमाणे हाच काळ आहे बदलायचा आणि बदल घडवायचा मात्र तो पुरोगामी हवा. हा पुरोगामी बदलच सावित्रीमाईं फुले यांना खरी आदरांजली असेल!

(मेघना सुर्वे  8433502994