मनपा अधिकारी नगरसेवक व ठेकेदार यांच्या संगनमताने दलित वस्ती निधीचा दुरुपयोग
मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या घोडबंदर विभागात साईनाथ सेवा नगर येथे असलेले जुने समाज मंदिर पुनर्बांधणी करिता मनपाने ठराव पारित करून मनपाच्या अधिकार्यांनी नगरसेवक व ठेकेदार यांच्या संगनमताने या दलित वस्ती निधीचा दुरुपयोग केल्याचे समोर आले आहे. या विरोधात पत्रकार राजेश जाधव यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे, तर संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही केली आहे , त्यामुळे शहरातून अशाप्रकारचा दुरूपयोग करणाऱ्या अधिकारी ठेकेदार व स्थानिक नगरसेवक यांना दोषी म्हणून कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
देशातील अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि अल्पसंख्यांक यांच्या उन्नतीसाठी सरकार नेहमीच वेगवेगळ्या योजनेचा आधार घेत त्यांना संधी उपलब्ध व्हावी या करिता कार्यशील असते. मागासवर्गीय समुदायास प्रगतीचा मार्ग खुला व्हावा या उद्देशाने त्यांच्या विकासासाठी वेगळा निधी उपलब्ध करून दिलेला असतो, तो निधी फक्त तिथे वापरला जातो जिथे अनुसूचित जाती- जमातीची समूह वस्ती आहे . अशी निधी वापरून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी अशा प्रकारचा निधी वापरला जातो. पण घोडबंदर येथे मात्र मनपाचा धिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे व ठेकेदार आणि नगरसेवकांनी मिळून या निधीचा दुरुपयोग केल्याचे उघड झाले आहे.घोडबंदर विभाग ऐतिहासिक किल्ल्याचा भाग आहे, या शहराला याच भागातून एक महापौर तर दोन वेळा उपमहापौर पदे मिळालेले हे गोडबंदर गाव आहे ज्यांनी सत्तेत पदे भोगली आहेत त्यांचे वास्तव्यही याच परिसरात आहे. सध्या सत्तेत असतानाही या प्रकारामागे त्यांचाही हात असल्याचे बोलले जात आहे. सरकारचा दलित वस्ती सुधारणेसाठी आलेला निधी दलित वस्ती सुधारण्यासाठी न वापरता त्याचा वापर चक्क जुन्या मच्छी मार्केट साठी वापरल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मनपाच्या अधिकार्यांनी नगरसेवक व ठेकेदारांच्या संगनमताने समाज मंदिर पुनर्बांधणीसाठी दलित वस्ती निधी वापरण्याची निविदा काढली गेली, तसा मनपात ठराव घेण्यात आला या समाज मंदिर पुनर्बांधणीसाठी २३ लाख ९९ हजार २८३ रुपये इतकी रक्कम मंजुरी केली आणि ती रक्कम चक्क समाज मंदिर पुनर्बांधणी न वापरता चक्क जुने मच्छी मार्केट रंगरंगोटी साठी वापर केला आहे. याची माहिती पत्रकार राजेश जाधव यांना कळताच त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार व अन्य सहभाग असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी मागणी माननीय आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती पण त्यांच्या मागणीला आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन केले गेले. आता पहावे लागणार आहे की आयुक्त महोदय कधी जागे होतील आणि दलित वस्ती सुधारणेचा निधीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कधी उगारतील हे येणारा काळच ठरवेल.